top of page
Search

शिकण्यातला संवाद… संवादातून शिकणं!

  • Writer: Prajakta
    Prajakta
  • Nov 6, 2025
  • 2 min read

Updated: Nov 11, 2025


एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करणे (रिपीटेशन), एखाद्या गोष्टीचा सराव करणे.. यात काही फरक असतो का?हा प्रश्न जेव्हा मी मुलामुलींना विचारला तेव्हा याचे हो/नाही असं काहीही उत्तर येईल; शिवाय पटकन दुसऱ्या सेकंदाला येईल असं मुळीच वाटलं नव्हतं. पण मुलांनी अगदी सहज सोप्या शब्दांत यातले त्यांना वाटणारे फरक सांगितले… शिकण्यातल्या संदर्भात सरावाची आवश्यकता काय? आणि पुन्हा पुन्हा करण्याची गोष्ट कोणती याची स्पष्टीकरणासह उदाहरणं मुलांनी दिली..

संवादाची इतकी सवय झाली आहे आम्हाला (ताया आणि 7 ते 8 वर्षांच्या मुलांमुलींचाचा चमू) की विषयांच्या कितीही खोलीत डुबकी मारून येऊ शकतो आम्ही. खूप गाठी अशाच सुटत जातात. तेव्हा दरवेळी जाणवतं, शिकण्यातलं संवाद हे माध्यम किती कमी लेखत राहिलो आपण!


या वयातल्या ‘मुलांसोबत काम करण्याचे’ अनेक मार्ग (ठरलेले) आहेत… अगदी अतिसुलभीकरण झालेलं ‘हसत खेळत शिक्षण’ असो, हाताने काहीतरी करत राहून शिकण्यातलं ‘कृतीयुक्त शिक्षण’ असो, निसर्गाच्या कुशीत जाऊन अनुभवातून शिकणं असो… असे बरेच पदर आहेत सध्या समोर. काहींनी त्यातलं एकंच एक निवडलं, तर काही जण सगळ्या पदारांचे टोक आलटून पालटून पकडत त्यातून नवा गोफ तयार करताना दिसतात… पण या सगळ्यांच्या मुळाशी असणारा महत्वाचा घटक म्हणजे ‘संवाद’. तुम्ही आम्ही बाकी सगळं करत असू पण केलेल्या सगळ्याबद्दल ‘संवाद’ घडत नसेल तर मग जे सगळं केलं त्यातून मुलांनी घेतलं काय? हे कळत नाही.


‘मुलांनी घेतलं काय हे कळत नाही’ असं म्हणायचं आहे इथे. ‘मुलांनी काय घ्यावं हे आपण ठरवून त्यांना सांगणं’ हे नाही.

जितक्या वेगवेगळ्या भागातील , वयातील मुलामुलींसोबत वेळ देता आला तितकं कळत गेलं हे संवाद प्रकरण. संवाद म्हणजे ‘माझे ज्ञान पुढच्या पिढीला देणे’ असा सोयीस्कर अर्थ लावला जातो. तो एकांगी काय मुळात संवादंच नाही. त्यामुळे शिकण्याकडे ‘बघणं’ होत नाही. खरंतर शिकवायचं नाही, आपण नुसतं असायचं आहे आणि आजूबाजूला जे शिकणं घडतंय ते बघायचं आहे… हे आपल्या मज्जासंस्थेला शांतपणे करता येईल अशी जडणघडणंच नाही आपल्या प्रौढांची. तिथे सगळी गोची आहे.


काहीही घडलं बिघडलं की आधी कॅमेरा निघतोय हातातला, तुझी पोस्ट पडली की ती वाचता वाचता माझी कमेंट माझं मत लिहायला सुरूच करते… माझ्या मेंदूने सगळं प्रोसेस करायच्या आधीच, माझ्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधल्या स्टेट्सला डकवलेल्या कानाडोळा करता येणाऱ्या गोष्टी माझ्या अस्मितेला दुखावतात… हे सगळं अनुभवताना वाटत राहतं मेंदूतंही पचनसंस्था असते. जिचे आरोग्य आम्ही जपले नाही. आलेल्या गोष्टी भावना असो, विचार असो त्यावर प्रक्रिया करण्यासाठी आमच्याकडे एकतर शब्द, भाषेची संरचना नाही किंवा असली तरी त्याचा सराव नाही, ती वापरण्याचा अनुभव नाही.. मग जे येतंय माझ्या मनाविरुद्ध आणि आकलनाच्या वेगापलीकडे ते सगळं पचवायचं कसं? इन्स्टंट फॅशन, इन्स्टंट डिलिव्हरी, इन्स्टंट लाईक-शेयर-सबस्क्राईबसाठी ज्या प्रचंड वेगात प्रक्रिया व्हायला हव्यात विचारांवर; त्याचा सराव तर शाळा, कॉलेजात झालाच नाही. आपल्याकडची कुटुंबव्यवस्था, समाज तर अशा शिक्षणाची जबाबदारी घेतंच नाही. ते गुरू,शाळा,ट्युशन आणि सरकार यांचंच काम. छप्पर, जेवण आणि कमीतकमी आवश्यक सुरक्षितता यापलीकडे या सामाजिक संस्थांकडून काही अपेक्षा आपण ठेवत नसू तर मग संवादाला जागा ती कुठे?


आम्ही ‘प्रयोग म्हणजे काय?’ अशा विषयांवर ७ ते १३ वर्षांच्या मुलामुलींसोबत जेव्हा अगदी शून्यातून बोलायला लागतो… तेव्हा येणाऱ्या मुद्द्यांमधून, प्रश्नांच्या शक्यतांमधून कळतं गृहितकांना आव्हान द्यायचं असेल, सामाजिक प्रतिक्षिप्त क्रियांना आळा घालायचा असेल तर संवाद हा निव्वळ मोठ्यांच्या जगाचा भाग असून चालणार नाही. त्याचा रियाज आवश्यक आहे.

 
 
 

2 Comments


Paul Allen
Aug 08

Really valuable content here https://en.wikipedia.org/wiki/Web_design I was searching for information on this topic and your article answered many of my questions. Keep up the excellent work!


test image

Like

Paul Allen
Aug 08

Really valuable content here https://en.wikipedia.org/wiki/Web_design I was searching for information on this topic and your article answered many of my questions. Keep up the excellent work!


test image

Like
bottom of page